कोकणचा मेवा… परप्रांतीय एजंटांच्या हाती! — अ.र.वालावलकर

कोकण… नुसतं नाव जरी उच्चारलं तरी डोळ्यासमोर उभी राहते ती हिरवीगार सृष्टी, निळ्या समुद्राची गाज आणि देवगडचा हापूस आणि अस्सल कोकणी काजूचा मधाळ गोडवा! हे इथल्या मातीचं, इथल्या घामाचं सोनं. पण आज त्याच सोन्याला भेसळीचं ग्रहण लागलंय.

कोकणी माणसाचा स्वभाव सरळ. तो कष्टकरी, प्रामाणिक. वर्षभर जीवापाड मेहनत करून, निसर्गाच्या लहरी झेलून तो आपल्या ‘राजा’ला देवगड हापूसला आणि राणीला – कोकणी काजूला जपतो. त्याला वाढवतो. त्याचा सुगंध सातासमुद्रापार पोहोचवतो.

पण ह्या भोळ्या भाबड्या शेतकऱ्याच्या साधेपणाचा फायदा घेतला जात आहे. बाजारात आज काय चित्र आहे?

• भेसळ: बाहेरच्या राज्यातून, कमी गुणवत्तेचा आंबा आणायचा. तो कृत्रिमरीत्या पिकवायचा आणि ‘अस्सल देवगड हापूस’ म्हणून विकायचा!

• फसवणूक: कर्नाटक, केरळ किंवा इतर भागातून आलेला आंबा, कोकणच्या आंब्यामध्ये मिसळला जातोय. अस्सल आणि नक्कल यातला फरक सामान्य गिऱ्हाईकाला कळत नाही, आणि त्याचा ‘राजा’ म्हणून घेतलेला घास हा निव्वळ फसवणुकीचा ठरतोय.

• काजूचा प्रश्न: काजूलाही हेच ग्रहण! चांगल्या प्रतीच्या कोकणी काजूमध्ये निकृष्ट दर्जाचा काजू मिसळून, ‘उत्कृष्ट कोकणी काजू’ म्हणून विकला जातोय.

सर्वात दुःखद गोष्ट म्हणजे, हे सर्व भेसळ करणारे आणि प्रचंड नफा कमवणारे कोण आहेत? तर ते आहेत परप्रांतीय एजंट आणि मोठे व्यापारी.

कोकणी शेतकऱ्याला आपल्या पिकाचे योग्य मोल मिळत नाही. हवामान, कर्ज, वाढता खर्च आणि अनिश्चित बाजारपेठ यामुळे तो आधीच मेटाकुटीला आलेला असतो. अशा वेळी, हा एजंट येतो, त्याला पैशाचं आमिष दाखवतो. “तुम्ही आम्हाला माल द्या, आम्ही योग्य भाव देऊ,” असं बोलून, तो अगदी कमी किमतीत शेतकऱ्याचा अस्सल मेवा विकत घेतो.

शेतकऱ्याला लगेच पैसे मिळतात, म्हणून तो नाईलाजाने आपला जीव की प्राण असलेला माल या एजंटांच्या हवाली करतो.

कोकणचा राजा आज परक्यांच्या ताटात…आणि त्याला जन्म देणाऱ्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी.

कोकणची अस्मिता, कोकणचा ‘जीआय टॅग’ आज धोक्यात आहे. अस्सल हापूस आणि शुद्ध कोकणी काजू ही केवळ नावं उरणार नाहीत का? कोकणच्या मातीचा सुगंध या भेसळीच्या गर्दीत हरवून जाईल का?

कोकणी माणसाचा विश्वास, त्याची मेहनत आणि त्याच्या मातीची प्रतिष्ठा जपण्याची आज खरी गरज आहे. हा केवळ मेवा नाही, हा कोकणवासीयांचा श्वास आहे!

अ.र.वालावलकर…🖌

झिलगो फाटेक चाकरी करुक जाता तो रातच्याक येता…

Leave a comment