अहो, काय विचारताय! काजू आणि कोकणी माणूस.. अ.र.वालावलकर 🖌

हे म्हणजे केशव आणि पांडुरंग असं काहीतरी नातं आहे. एकाची स्तुती करायला जावं, तर आपसूक दुसऱ्याच्या चरणांवर माथा टेकावा लागतो. हा काजू म्हणजे नुसता मेवा नाही हो! हा आहे कोकणी माणसाच्या स्वभावाचा गर,थेट गोव्याच्या किनाऱ्यापासून महाराष्ट्राच्या मनात आलेला!

मंडळी, पहिल्यांदा स्तुती करूया ती या काजूराजाची! इंग्रजीत त्याला “कॅश्यू“ म्हणतात, पण त्याला हे परदेशी नाव शोभत नाही. तो आपला ‘काजू’! झाडावर लटकलेला पाहिला, की जणू काही निसर्गाने आपल्या खजिन्याचा कळसच एका लाल पिवळ्या फळावर ठेवला आहे.

अहो, काय तो डौल! वर ते काजू सफरचंद नावाचे भरगच्च फळ. स्वतः आंबट तुरट असूनही, त्याला काही देण्याचं वावडं नाही. तो रसदार, तो गरगरीत! पण त्या फळाच्या खाली, एक मान वाकवून, अगदी नम्रपणे लटकलेली असते आपली काजू बी…..

या बीची गोष्ट म्हणजे एखाद्या तत्त्वज्ञानाला लाजवेल अशी आहे. तुम्ही पाहा, या बीच्या बाहेरचं कवच किती खरखरीत, निगरगट्ट… जणू काही जगाच्या सगळ्या संघर्षांची नोंद त्याच्या अंगावर आहे. पण, तीच बी जेव्हा भाजली जाते, जेव्हा ती अग्नीचा दाह सहन करते, तेव्हा आतून काय बाहेर येतं? अहो, पांढराशुभ्र, गुळगुळीत, लज्जतदार, पूर्णतः निर्दोष गर.. ज्याला आपण काजूगर म्हणतो…

काय शिकवण आहे ही? बाहेरून कठोर आणि आतून परम कोमल. नुसती “माय” म्हणायची, तर ती नारळीची. पण हा काजू म्हणजे राजा.. दशावतारातील राजा …किमतीत राजा, चवीत राजा आणि स्वभावानेही राजा! त्याचा एक तुकडा तोंडात टाका… तो खमंगपणा, तो किंचित गोडवा, तो कुरकुरीत आवाज… लगेच तुमचा मूड बदलतो.. एकदम डायरेक्ट…हा केवळ पदार्थ नाही, हा आहे क्षणभरचा आनंद!

आता या काजूची स्तुती तर झाली. पण, या राजाला ओळखणारा, त्याला खरं वैभव देणारा, तो आपला कोकणी माणूस!

अहो, हे काम सोपे नाही! काजू बी भाजताना त्यातून तेल उडतं, ते साध्यासुध्या जीवाचं काम नाही! हे तेल म्हणजे नुसता अग्नि संस्कार… पण आपला कोकणी माणूस… हा आहे संयमाचा पुतळा!

तो कधी घाई करत नाही. त्याला माहीत आहे, जे चांगले असते, ते सहज मिळत नाही. तो त्या बीला अगदी जपून, अचूक तापमानावर भाजतो. कारण त्याला फक्त बी भाजायची नसते, त्याला त्या बीच्या आतला गर जपावा लागतो!

आणि फोडणे, तो एक छोटासा, पण धारदार दगड घ्यायचा… आणि त्या बीवर नेमका घाव घालायचा. हा नेम म्हणजे नुसता हातखंडा नाही, हा आहे पिढ्यानपिढ्या आलेला अनुभव! दगड जास्त जोरात मारला, तर गर तुटतो. हळू मारला, तर कवच फुटत नाही. अगदी मोजून मापून केलेला तो घाव… आणि मग त्यातून तो अख्खा, अखंड गर बाहेर काढायचा… अहाहा! ही कला दुसऱ्या कोणाला जमणार नाही!

शहरात बसून, “Readymade“ काजू खाणाऱ्या माणसाला या संघर्षाची कल्पना तरी येईल का? छे! Readymade तर कपडे मिळतात, पण त्यामागे असलेल्या टेलरचे कष्ट कोणास ठाऊक..,

कोकणी माणूस म्हणजे त्या काजूराजासारखाच. बाहेरून थोडासा कठोर, थेट आणि स्पष्टवक्ता. पण, आतून? आतून तो मायेचा, गोडवा जपणारा आणि आपल्या पाहुण्यांसाठी काजूच्या गरासारखाच निष्पाप आणि तयार!

तो स्वतः कष्ट करतो, अंगावर तेल उडवून घेतो, पण जगाला मात्र उत्तम आणि स्वच्छ काजू देतो. त्याला ‘अमूल्य’ गोष्टीची किंमत माहीत आहे, कारण त्याने त्या गोष्टीवर घाम गाळला आहे.

काय, पटतंय ना माझं? आता यावर एक गरमागरम चहाचा घोट आणि खमंग काजूची जोड मिळाली, तर स्वर्ग दोन बोटं उरला नाही म्हणून समजा!

अ.र.वालावलकर 

Leave a comment