मंडळी, जिथे ‘प्रॉपर्टी’ साठी घरच्यांना आणि ‘घरचे’ प्रॉपर्टीसाठी जपणाऱ्यांचे कटू वास्तव पदोपदी भेटते; जिथे पुढील वर्षीच्या आंबा-काजूच्या दरासाठी निष्पाप बागा जपल्या जातात, त्याच वाटेवर…
सुशिक्षितांच्या या व्याकरणाच्या शुद्ध, ‘माणसे मिळतात आणि वस्तू भेटतात’ म्हणणाऱ्या जगावर, हे काही अशिक्षित कलापुजारी! यांच्या हाती काय? केवळ पायपेटी , पखवाज आणि झांज एवढेच त्यांचे भांडवल. आणि या तुटपुंज्या साहित्यावर ते संपूर्ण नवरसांचे जग उभे करतात. विचारा, याहून मोठी किमया ती कोणती?
भगवंताचे दशावतार, जे खल निर्दालन आणि भक्त पालनासाठी झाले, तेच दशावतार आजही आपली रात्र जागवून ती परंपरा पूर्ण करत आहेत. बिचारे! उभ्या आयुष्यात तो राजा होईल न होईल, पण त्या परिधान केलेल्या वस्त्रांचा विवेक त्याला कायम ‘राजा’ म्हणूनच प्रेक्षकांच्या मनात स्थान देतो. पण प्रेक्षकांच्या मनात दडलेल्या हिरण्यकश्यापूला कधीतरी नृसिंह अवतार खांब विदीर्ण करत बाहेर येईल, ही भोळी आशा
दशावतार म्हणजे केवळ पखवाजावरची ती थाप नाही, पायपेटीच्या स्वरांचे ते आर्त विव्हलणे नाही, किंवा झांजेवर वाहिलेली ती सर नाही… हा संपूर्ण भवसागर आहे! आणि या भवसागरात आता एकमेव राहिलेला पुरुषप्रधान कलाक्षेत्राचा दीपस्तंभ आहे.
शास्त्रज्ञांनी मानवी जीवनाचा आणि युगाचा काळखंड निश्चित केला, पण या दशावतारी प्रयोगाचा नेमका कालावधी निश्चित करण्यासाठी आजही अभ्यास चालू आहे… आणि तो एका न उलघडलेल्या कोड्याप्रमाणे कायम राहील, यात शंका नाही.
पण…
आता काय! आज तो रंगमंचावरचा राजा, ती अबला, तो मैशासूर, तो नारद आणि ती गरुडाची पिल्ले… ही ‘सुखी आयुष्य’ नावाच्या भ्रमात अडकून शहरांकडे रवाना झाली आहेत. त्यांचे झालेले स्थलांतर! त्यामुळे राजश्रयाच्या प्रतीक्षेत असलेल्या या लोककलेच्या महान परंपरेचा हा शेवटचा टप्पा तर नसावा? ही भीती..
पण “अभी रुको!”…
ती वेळ येताच, या अंतिम चरणाआधी, दशावतारातील भीष्मचर्याचा तो निधड्या छातीचा आवाज घुमू लागेल…
“हीहीहाहाहाहा! वायच ह्रवा… जातास खय? ह्यो बाबी कलिंगण अजून जितो हा… काय ते क्षुद्र बाण कोकणातील माझ्या ह्या लोककलेला अलुप्त करतील? अरे, असेल तुझ्या अभिनय पदवीच्या मनगटात बळ, तर ये ह्या मंचावर आणि कर माझ्याशी संवाद युद्ध”
आणि लोकराजा, तो एकाकी कलाकार, पुन्हा अवतार घेईल… या समरभूमीवर! फक्त आणि फक्त एकटा…
अ.र.वालावलकर


Leave a comment