कोकणी माणूस….अहो, माणूस नाही, तो म्हणजे निसर्गाच्या एका अत्यंत रसाळ आणि हळव्या कवितेचा कोमल चरण. त्याचे गाव म्हणजे नुसते घर नाही, तर परमात्म्याने सुट्टीवर असताना बांधलेले खास फार्म हाऊस. जिथे झाडं बोलतात, नदी हसते आणि समुद्राचे पाणीसुद्धा पायाशी येऊन विनयाने झुकते.
पण हा आपला देवमाणूस… याला झाली ती चाकरीची पीडा..ओवाळून टाकलेली, बघा….काय म्हणायचे याला? आपली सातस्वर्गाची जागा सोडून, मुंबई नावाच्या रबरी चपलेच्या गर्दीत याला रमावे लागते. गावाकडे नारळी पोफळीची झुलणारी छत्री असताना, हा तिकडे गगनभेदी इमारतींच्या सिमेंटच्या जंगलात जाऊन राहतो. स्वतःच्या बागेत शिरवळ्याचा पाऊस असताना, तो तिकडे रेल्वेच्या पुलाखालच्या गटाराच्या संगीतावर जीव जगतो.
त्याला विचारा, का हो, एवढा सुंदर निसर्ग सोडून इथे कशाला? तो छाती पाऊण इंच फुगवून सांगणार, चाकरमानी मी! मुंबईत असतो.. शीरा पडो
हा चाकरमानी शब्द म्हणजे त्याच्या आयुष्याच्या दुःखाचा एक मिश्कील मुखवटा. त्याची क्षमता तर हिमाल्यासारखी उंच, पण त्याला मिळाली आहे, ती एखाद्या चपटी, शुल्लक फाईलवरची सही. तो कामाला जातो, पण त्याच्या मनाची शेती गावीच राहिलेली असते.
गंमत बघा..हा माणूस गावी येताना अंगभर पांढरा सदरा आणि पायघोळ पॅन्ट घालणार. बोलणार कसा? मुंबईत सगळं असतं हो! अहो, तिकडे तर पाणीसुद्धा बिल भरल्यावर मिळतं, Fresh Air साठी माझ्या घरापासून अवघ्या ५-६ मैलावर असलेल्या बोरिवली नॅशनल पार्क नाहीतर आरे मध्ये चालायला जातो.. तुम्हाला गावी इथे जंगलात ती फ्रेश हवा मिळणं कठीण ओ!!!
आणि मग तो वसई-विरार, पालघरच्या त्या पेंढारलेल्या चाळीतल्या खोलीचं कौतुक सांगणार. अहो.. वाचक हो, जिथे बाळकृष्ण उभा राहिला तर डोक्याला कडी लागून जाईल, अशा जागेत हा प्रचंड माणूस राहत असतो.
तो सुट्टीला गावी येतो, तेव्हा त्याचे हृदय दोन्ही दगडांवरचे दही असते. तिकडे कामाची धावपळ, इकडे गावाच्या सोडलेल्या मातीची आठवण. त्याची ती उदरनिर्वाहाची रापण असते ना, ती समुद्राच्या तळाशी जाऊन फक्त दुःख ओढून आणते. त्याला वाटते, चला, या दोन दिवसांत गावाला उद्धरून टाकू..पण गाव, ते गाव असते.
आणि मग काय! परतीचा दिवस येतो. नारळीच्या सावलीत त्याचे डोळे पाणावतात. तो बंद दाराला आणि रानटी झालेल्या शेताला शेवटचा नमस्कार करून निघालेला असतो.
पण ही शोकांतिका इथे संपत नाही…बरं का, जेव्हा तो पुढील वर्षी परत येतो, तेव्हा त्याला आपल्या घराशेजारी आपल्या ओळखीचे, आपलेसे असलेले सावंत,परब,देसाई,जाधव दिसत नाहीत आणि तिथे आता वेगळीच नावे… यादव,शर्मा,वर्मा…
तो चक्रावतो. त्याची ती मायेची ऊब अचानक थंडगार झालेली असते, ह्यात परप्रांतीय लोकांचा दोष नाही. ते तर रिकामी जागा भरणारे कर्मनिष्ठ प्राणी. दोष आपल्या कोकणी आडनावांचा आहे…या आडनावांनी भावनिक रापणीच्या जाळ्यात अडकलेली आपली सुपीक कापणी वेळेत घरी आणली नाही. त्यांनी अल्प पैशांच्या मोहात आपली माय माती विकून टाकली.
अहो, आपले दुःख असे आहे, की आपण स्वर्गाचे मालक असूनही भाड्याने राहतो आहोत.
आज पु ल असते तर नक्कीच मिश्किल हास्यात म्हणाले असते – “या कोकणी माणसाच्या आयुष्यातला विनोद हाच आहे की, तो शहरात सुखाचा शोध घेतो आणि सुखाला वाटते की, हा माणूस घरी नाही, म्हणून आपणही आता मुंबईला जायला नको.
आणि मग उरते काय? फक्त मुंबईत राहिल्याचा पोकळ अभिमान आणि गावाकडे परत न येण्याची एक अदृश्य, गोड खंत, आणि आपण म्हणतो
“जा खय नाय गावचा ता आमच्या कोकणात आसा, येवा कोकण आपलाच आसा”
अ.र.वालावलकर

Leave a comment