शालेय आयुष्यात अभ्यासक्रमाच्या नीरस पोथ्यांपेक्षा, हास्यानंदाचे अक्षरशिल्प पु. ल. देशपांडे आणि अभेद्य कवच स्वा. सावरकर यांच्या ग्रंथांचे पाथेय मी अधिक जगलो मस्तरांच्या उपदेशापेक्षा, वाजपेयी आणि पुलं यांचे विचार अधिक श्रवणीय वाटले.
आज पुन्हा असा मी असामीचे वाचन परिपूर्ण झाल्यावर, त्या अद्वैत लेखकाला उद्गार समर्पित करण्यासाठी, मी वाग्देवीकडे शब्दवाङ्मयाचे वरदान मागून ते हास्यदेवते प्रती म्हणजे पु.ल यांच्याप्रति बहाल करतो आहे…हा अभिप्राय म्हणजे माझे मनःपूर्वक अभिवादन..
असा मी असामी हे पुस्तक म्हणजे एका कोकणी माणसाची, ज्याच्या नशिबी मुंबईची नोकरी चाकरीची कर्मकथा लिहिली आहे, त्याची हृदयस्पर्शी आणि तितकीच हास्यगर्भ कहाणी आहे.
कोकणातील माणूस म्हणजे बर्वे, सखाराम गटणे) मूळतः सोज्वळ, साधेभोळे आणि आपल्या ‘अस्तित्वाच्या कोपऱ्यात’ रमणारे. त्याचे मन कोकणातल्या हिरव्यागार गर्द झाडीसारखे शांत, पण मुंबईत येऊन त्याची होते तीव्र दमछाक.
आज पु लं. असते तर ear to ear हास्य देऊन म्हणाले असते…
“अहो, कोकणातल्या त्या माणसाचं आयुष्य म्हणजे मुंबईच्या लोकलच्या वेळेसारखं आहे, वेळेवर गाडी पकडली तर मिळाली सुखाची आसामी, नाहीतर झाली दुःखाची गर्दी, हा कोकणी माणूस म्हणजे मुंबईच्या चाकरमानी पंगतीतील एक अपरिहार्य घटक, तो मुंबईत येतो, तेव्हा त्याच्या डोळ्यात असते शहराची झगमग, पण मनात असते मायेची ओढ“
असा मी असामी वाचताना आपल्याला क्षणोक्षणी जाणवते की, मुंबईत नोकरी करणाऱ्या प्रत्येक कोकणी माणसाचे आयुष्य म्हणजे बर्वे किंवा गटणे यांच्या अवतीभवती फिरणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब आहे. त्यांची स्वयंपाकघरातली कसरत, बॉसची चिरचिर, परस्परविरोधी शेजाऱ्यांशी जुळवून घेणं…इत्यादी इत्यादी, हे सारं काही म्हणजे मुंबईच्या न संपणाऱ्या धकाधकी हरवलेल्या प्रत्येक कोकणातल्या बाबल्याच्या मनाची सचित्र कहाणी.
पुलं हे केवळ लेखक नाहीत, बरं का,.. ते आहेत आपल्या आयुष्यातील साध्या साध्या क्षणांना साहित्याची अपूर्व झालर देणारे नवरत्न..
आता निवडणूक घोषणा झाली आहे आणि शास्त्राप्रमाणे आचारसंहिता देखील लागलीये म्हणा…त्यामुळे “तीन पैश्यांचा तमाशा“ पुन्हा वाचायला घेतलंय, नाही नाही अहो या पुस्तकाच्या नावाचा आणि राजकीय मंडळींचा काहीही संबंध नाही.. उगाच २ ऐवजी ३ देऊन त्यांची किंमत का वाढवावी…, असो
आपलं आयुष्य पु.लं मय होवो..
अ.र.वालावलकर

Leave a comment