कणकवलीचा नागवेकर डॉक्टरांचा **तो** प्रसंग आणि धगधगती वैद्यकीय संवेदनशीलता – अ.र.वालावलकर 🖌

१५ डिसेंबरचा तो दिवस कणकवलीसाठी केवळ एका घटनेचा साक्षीदार नव्हता, तर तो वैद्यकीय पेशातील वाढत्या असुरक्षिततेचा आणि रुग्ण-डॉक्टर यांच्यातील विरळ होत चाललेल्या विश्वासाचा एक आरसा होता. नागवेकर डॉक्टरांच्या बाबतीत घडलेल्या त्या दुर्दैवी प्रसंगाने संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडले. त्याचे पडसाद इतके तीव्र उमटले की, संपूर्ण जिल्ह्यातील डॉक्टरांनी एकजुटीने एक दिवशीय OPD बंद ठेवून आपला निषेध नोंदवला.

रस्त्यावर शुकशुकाट होता, दवाखान्यांची दारे बंद होती, पण लोकांच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले होते. हा बंद केवळ एका डॉक्टरसाठी नव्हता, तर तो त्या सुरक्षेसाठी होता ज्याची अपेक्षा प्रत्येक पांढरा कोट घालणारा माणूस समाजाकडून करत असतो.

आज जेव्हा आपण सिंधुदुर्गच्या वैद्यकीय विश्वाचा विचार करतो, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते विरोध डॉक्टरकीला नाही, तर काही विशिष्ट प्रवृत्तींना आहे. एकीकडे डॉ निगुडकर, डॉ परब, डॉ नावांगुळ, डॉ बाणवलीकर, डॉ दामले इत्यादी यांसारखी मोठी नावे आहेत. ही नावे आज केवळ पदव्यांमुळे मोठी नाहीत, तर त्यांनी कमावलेल्या लोकाश्रया मुळे मोठी आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून माणूस जेव्हा यांच्याकडे येतो, तेव्हा तो केवळ रुग्ण म्हणून नाही, तर एका विश्वासाने येतो. अनेक दशके उलटली, पण या डॉक्टरांना कोणी कधी काळ्या झेंड्याने किंवा संतापाने सामोरे गेल्याचे ऐकिवात नाही.

मग प्रश्न उरतोच… काही विशिष्ट डॉक्टरांच्याच बाबतीत लोकांचा रोष का उफाळून येतो?

जेव्हा एखादा रुग्ण मरणाच्या दारात असतो, तेव्हा त्याच्या नातेवाईकांसाठी तो जीव असतो, पण काही ठिकाणी तो केवळ एक केस किंवा बेड नंबर बनून राहतो.उपचारांच्या प्रक्रियेत काय घडतंय, हे जोपर्यंत आपुलकीने सांगितले जात नाही, तोपर्यंत संशयाची पाल चुकचुकत राहते, सामान्य माणसाला जेव्हा असं वाटतं की, त्याच्या हतबलतेचा फायदा घेतला जातोय, तेव्हा आदराची जागा संताप घेतो.

डॉक्टरकी हा पेशा नसून एक व्रत आहे, असं आपण मानतो. पण आजच्या काळात काही अनुभवांनी या नात्याला तडे दिले आहेत. एखाद्या नातेवाईकाच्या उपचारावेळी जेव्हा अनुभव येतो की उपचार एखाद्या वेगवान वन डे मॅचसारखे झटपट होतात, पण त्याचं बिल मात्र पाच दिवसांच्या टेस्ट मॅचसारखं अवाढव्य येतं. ही तफावत सामान्यांच्या मनाला चटके लावून जाते.

औषधे याच मेडिकलमधून घ्या असा जेव्हा आग्रह धरला जातो, तेव्हा सेवाभावापेक्षा कमिशनचा वास अधिक येऊ लागतो. हीच ती वेळ असते जिथे श्रद्धेला तडा जातो.

शेवटी…काय एक निरपराध जीव तर गेला, पण डॉक्टरांनी एक लक्षात ठेवलं पाहिजे की..

डॉक्टर हा देवाचा अवतार मानला जातो, पण देवानेही भक्ताच्या हाकेला ओ दिली पाहिजे. सिंधुदुर्गातील प्रतिष्ठित डॉक्टरांनी जो वारसा जपला आहे तो म्हणजे माणुसकीचा. ज्या दिवशी प्रत्येक डॉक्टर रुग्णाच्या डोळ्यातील भीती वाचायला शिकेल आणि ज्या दिवशी रुग्ण डॉक्टरांच्या मेहनतीचा आदर करायला शिकेल, त्याच दिवशी अशा संपांची आणि संघर्षाची गरज उरणार नाही.

नागवेकर डॉक्टरांसोबत जे घडलं ते क्लेशदायकच आहे, अनेकांसाठी ते योग्यच आहे पण “”हिंसा हा कशावरच उपाय असू शकत नाही“” ( असे मी नाही ते गांधी म्हणायचे ) पण या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रानेही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आम्ही निगुडकर किंवा परब का होऊ शकलो नाही? संदर्भ द्यायचं झालं तर m शिशुपाल हा जन्मतःच दैवी चमत्काराने वेढलेला होता, प्रचंड भौजबल आणि रणधुरंधर व शस्त्रशास्त्रविशारद होता पण पात्रता कितीही मोठी असली, तरी जर तुमच्यात विनय नसेल, तर तुमचे ऐश्वर्य हे भस्मासुर ठरते. अहंकार हा ज्ञानाचा शत्रू आणि विनाशाचा सखा आहे…डॉक्टरांनी हाथात अमृतकलश घेऊन रुग्णाकडे यावे जसे समुद्रमंथनाच्या वेळेस धन्वंतरी हे हातात अमृतकलश घेऊन प्रकट झाले.

”“शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्“”

अ.र.वालावलकर

Leave a comment