कोकणातील दलालांच्या तथास्तुला सहकाराचा रामराम – अ.र.वालावलकर 🖌

काय मंडळी बरा मा? आफ्रिकेतून येणाऱ्या त्या काजूचं आणि आपल्या कोकणी काजूचं नातं म्हणजे गल्लीतल्या अस्सल मल्लासमोर इंपोर्टेड प्लास्टिकची बाहुली उभी करण्यासारखं आहे, तो आफ्रिकन काजू बघायला अगदी टपोरा, उजळ वर्णाचा आणि शिस्तीतल्या सैनिकासारखा दिसेल, पण चवीच्या बाबतीत विचारूच नका… तो तोंडात टाकला की एखाद्या कोरड्या eraser चा तुकडा चावल्यासारखा भास होतो. त्याला ना तो कोकणचा ओलावा, ना ती लाल मातीची गोडी. पण आमचा भोळा कोकणी माणूस काय करतो, आपला अस्सल काजू गोणीत भरून स्वस्तात देतो आणि व्यापारी त्यात आफ्रिकेचा काजू मिश्र करून त्यावर Imported & Premium चा शिक्का मारून तोच पावसाने धुतलेला दगड आपल्यालाच महागात विकतो.

आणि तो कर्नाटकचा आंबा.. अरेरे,,,आमचा देवगडचा हापूस म्हणजे रसाळ गाण्यांसारखी एक गोड भैरवी आहे, तर हा कर्नाटकचा आंबा म्हणजे केवळ एका सुरात ओरडणारं Rap संगीत… माय## निस्ता बडबडता, दिसताना तो हापूसचा सख्खा भाऊ वाटतो, पण पेटी उघडली की कळतं हा तर कुणीतरी बनावट पाहुणा घुसखोरी करून बसलाय. 

आज परप्रांतीय मासे आणि फळांनी आपल्या बाजारपेठेत अशी काही रांगोळी घातली आहे की, आमचा स्थानिक माल बिचारा कोपऱ्यात उभा राहून स्वतःच्या अस्तित्वाची ओळख शोधतोय. गुजरातचे मासे बघा..त्यांच्याकडे समुद्र आहे म्हणून ते मासे एक्सपोर्ट करतात, आणि आमचा मालवण वेंगुर्लायचं पापलेट बिचारा लोकल ट्रेनच्या गर्दीत चिरडल्यासारखा कसाबसा मुंबई गाठतो, आणि हे परप्रांतीय त्याला 70-90 ने एक अशा दराने विकतात,…  हे म्हणजे कसं आहे माहितीये? आपल्या घरचं उत्तम जेवण शेजाऱ्याला द्यायचं आणि स्वतः हॉटेलच्या शिळ्या पार्सलवर समाधान मानायचं, ह्याला आमच्या इथे कर्मदळिद्री म्हणतात.

यावर उपाय एकच “सहकाराचा सोटा” जोपर्यंत आपण तालुकावार क्लस्टर बनवून या घुसखोर मालाला चेकपोस्ट वर अडवत नाही, तोपर्यंत हा प्रकार थांबणार नाही. आपल्या माणसाला सहकाराचं महत्त्व पटवून देताना सांगावं लागेल, अहो…एकत्र या नाहीतर उद्या आफ्रिकेतून काजू येईल, कर्नाटकातून आंबा येईल आणि तुमच्या कोकणात फक्त रेती आणि पर्यटकांचा कचरा उरेल.

Pricing च्या बाबतीत तर आपण इतके अहिंसक आहोत की, गांधींना पण मागे टाकू शर्यतीत, समोरचा व्यापारी म्हणेल त्या भावाला तथास्तु म्हणतो. अरे, आफ्रिकेचा काजू जर विमानाने येतो तरी तो स्वस्थ आहे  महाग असू शकतो, तर आमचा काजू अमृतापेक्षा गोड आहे म्हणून तो दामदुपटीने का विकला जाऊ नये?????

जेव्हा आमचा जिल्हा महासंघ बनेल आणि ठरवेल की, यावर्षी हापूसचा दर अमुक राहील, तेव्हा मुंबईच्या वाण्याच्या दुकानातील तराजूने सुद्धा थरथर कापलं पाहिजे. परप्रांतीय मालाला नो एन्ट्री चा बोर्ड लावायचा असेल, तर आपल्या मालाची व्हॅल्यू आपल्यालाच ठरवावी लागेल. नाहीतर कसं होईल, बागेत राबणार आपण, कष्ट उपसणार आपण आणि खिशातल्या लक्ष्मीची पूजा मात्र तो आफ्रिकन काजू पिकवणारा किंवा मुंबईचा दलाल करणार…

सहकाराचा हा दशावतार आपल्याला नीट साजरा करावा लागेल, जर आपण या इंपोर्टेड मालाचा मोह सोडला आणि आपल्याच चेन ला पॉलिश केलं, तर साक्षात लक्ष्मी सुद्धा कोकणात येताना कोकण रेल्वेचं कन्फर्म तिकीट काढून येईल, आणि फळ उत्पादन, निर्यात आणि फळप्रक्रियेत कोकणाचा सहकार आणि स्वदेशी विषयात सुजलाम सुफलाम होईल.

बाकी कोकणाला लोकल, ग्लोबल आणि मल्टीलेवलला घेऊन जाणाऱ्या संघटना आज अनेक आहेत आणि सुरु होतील आणि संस्थापक त्यांचं कोकणाप्रति प्रेम व माया सामान्य माणसांच्या दृष्टीत portray करण्यासाठी कंपन्या आणि राजकारण्यांकडून service चार्जेस घेऊन आपला उदरनिर्वाह करतील बहुदा करत देखील असतील, पण आपल्यासाठी आपणच आहोत हे विसरून चालणार नाही.

अ.र.वालावलकर 

Leave a comment