मंडळी, राजकारण हा प्रांतच असा आहे की इथे कधी काय होईल आणि कोण कोणाच्या गळ्यात पडेल हे सांगणे म्हणजे ब्रह्मदेवालाही कोडे घालण्यासारखे! आता हेच पहा ना, ठाणे महानगरपालिकेच्या आखाड्यात भाजप आणि शिवसेनेची युती पक्की झाली. म्हणजे लग्नाची तारीख ठरली, पत्रिका छापल्या आणि आता मांडवात कोण कोणापेक्षा वरचढ हे ठरवणे पुढच्या निवडणुकीपर्यंत चक्क गुलदस्त्यात राहणार!
पण या सगळ्या राजकीय सांधेजोडीत, ज्याचा बळीचा बकरा होतो, तो म्हणजे आमचा बाब्या हा बाब्या म्हणजे पक्षाचा तो तळागाळातील कार्यकर्ता, ज्याच्या डोळ्यांत नगरसेवक पदाचे स्वप्न तरळत होते. त्याला वाटले होते, “यंदा आपल्या गल्लीत आपलाच बोर्ड लागणार”
पण कसलं काय आणि कसलं काय? निवडणुकीला उभे राहायचा विचार करण्याआधीच, या बिचाऱ्याच्या स्वप्नांचे डिपॉझिट जप्त झाले आणि तो वास्तवाच्या खडकावर असा काही दणदणवून आपटला की, विचारू नका
आता आमचा हा बाब्या काय करणार….तर तेच, जे त्याने गेली सात वर्षं इमाने इतबारे केले आहे. साहेबांच्या चुलत सासर्यासाठी, किंवा मेहुणीच्या जावेसाठी, मुलीसाठी मुलासाठी किंवा खुद्द साहेबांच्या सौभाग्यवतींसाठी वहाणा झिजवणार. त्याचे काम ठरलेले….भर उन्हात उभे राहून, पंख्याच्या रेग्युलेटरलाही लाज वाटेल इतक्या वेगाने पक्षाचा झेंडा फिरवायचा आणि घोषणा द्यायच्या…अहो, जन्माला आल्यावर हा जेवढ्या जोरात रडला नसेल, त्यापेक्षा अधिक टिपेच्या सुरात हा साहेबांसाठी घसा फोडणार.
कारण गणित सोपे आहे. लहानपणी रडल्यावर जशी आई जवळ घेऊन दूध पाजायची, तसे आता घसा कोरडा पडल्यावर साहेब जवळ घेतात. फक्त दुधाची जागा आता वडापाव, कटिंग चहा, बिर्याणी आणि क्वचित ती (जी संध्याकाळी घ्यायची असते) यांनी घेतली आहे. साहेब याला जवळ घेतात, पाठीवर थाप मारतात आणि आईच्या अंगाईप्रमाणे गोड आवाजात म्हणतात, “”“बाब्या, तू पक्षात खूप मोठा होणार रे”“”
ही राजकीय अंगाई ऐकून कार्यकर्ता भारावून जातो. मग घरी गेल्यावर आपल्या बायकोला, भावाला आणि म्हाताऱ्या बापाला असा काही छाती फुगवून सांगतो, जणू त्याने गडच जिंकलाय…अहो, साहेबांच्या नजरेत माझी किंमत काय समजलात…? आज रॅलीमध्ये अख्ख्या गर्दीला त्यांनी एकच वडापाव दिला, पण मला बोलावून दोन दिले…दोन वडापाव, आता या भोळ्या जिवाला कोण समजावणार की, तुझी किंमत त्या अतिरिक्त पाच रुपयांच्या वडापावाइतकीच ठरवली गेली आहे.
म्हणून बाबांनो, या वेळेस तरी डोळ्यावरची ही भक्तीची पट्टी काढा. वर्षानुवर्षे दुसऱ्याच्या पालखीचे भोई होण्यापेक्षा, एकदा स्वतःच्या हिंमतीवर, अपक्ष म्हणून उभे राहून दाखवा. आणि हो, हे अपक्ष राहणे म्हणजे समोरच्या उमेदवाराशी सेटलमेंट करून पाकीट मिळवण्यासाठी नसावे, तर आमचा कणा अजून शाबूत आहे आणि तो कोणाच्याही दावणीला बांधलेला नाही हे दाखवून देण्यासाठी असावे
बाकी, युती होईल किंवा तुटेल, पण बाब्याचा वापर मात्र तसाच राहील, जोवर तो स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकत नाही
बाकी निवडणूक संपेपर्यंत राहिलेल्या पत्रकारांचा नक्कीच सिंहासन चित्रपटातील दिघू टिपणीस होणार हे नक्की.
अ.र.वालावलकर

Leave a comment