अहो, गंमतच आहे सगळी….
त्या दिवशी आमचे सावंत काका हातात टाइम्स घेऊन कपाळावर आठ्या घालत बसले होते. मला म्हणाले, अ.र, बघितलंस का… हे पाश्चात्य लोक सांताक्लॉजच्या त्या बारा शिंगांच्या हरणांना कसं ग्लोरिफाय करतायत! आणि आपल्या रामायणातल्या पुष्पक विमानाचा उल्लेख आला की म्हणे दिस इज ऑल कल्पनिक… म्हणजे मिथॉलॉजी
मी म्हटलं, काका…त्याचं असं आहे, की इंग्रजी भाषेने आपल्याला एक फार मोठं गिफ्ट दिलंय, ते म्हणजे शब्दांचा गोंधळ. त्यांच्याकडे जे जे गूढ असतं, त्याला ते Magic म्हणतात आणि आपल्याकडे जे जे प्रगत असतं, त्याला ते Mystic म्हणून मोकळे होतात, आणि आपण स्मितहास्य देतो.
मुळात सांताक्लॉजच्या त्या स्लेज गाडीला ना इंधन लागतं, ना धावपट्टी. तरीही ती Cute वाटते. पण आपलं वैमानिकशास्त्र मांडणारे भारद्वाज ऋषी मात्र यांना काल्पनिक वाटतात. अहो, ज्या संस्कृतीने शून्याचा शोध लावला, जिने ग्रहांच्या गती मोजल्या, तिने हवेतून प्रवास करण्याचे तंत्र शोधले असेल, यावर विश्वास ठेवायला यांचं बौद्धिक दिवाळखोरपण आड येतं..मला वाटतं, आपल्याकडे जे जे अनाद्यंत आणि तेजोमय आहे, त्याला मिथ म्हणणं हीच एक मोठी फॅशन झाली आहे. सांताने चिमणीतून आत येणं हे Logical आणि तुकाराम महाराज पुष्पक विमानातून वैकुंठला जाणे हे Illogical हा कुठला न्याय?
खरं तर, आपली ही अस्मिता जपायला आपणच विसरलो आहोत. आपण कसं, पाश्चात्य शिक्का असल्याशिवाय स्वतःच्या घरातल्या देवालाही मानत नाही. तिकडच्या साहेबाने योग ला Yoga म्हटलं की आपल्याला त्याचं महत्त्व कळतं. उद्या जर नासाने जाहीर केलं की पुष्पक विमानाचं इंधन हे Spiritual Energy वर चालत होतं, तर आपले हेच लोक बघा, आमचं कसं ग्रेट आहे.. (काय ते माहित नाही, बरं का…) म्हणत पेढे वाटतील.
कृष्णविवर is so outdated, Blackhole is in fashion. आजकालच्या पिढीला सांताची रेनडिअर्स जवळची वाटतात, कारण त्यासोबत चॉकलेट्स येतात. आपल्या पुष्पक विमानासोबत मात्र धर्माचं आणि कर्तव्याचं मोठं ओझं येतं, जे पेलण्याची आज अनेकांची कुवत नसते
शेवटी काय, सांता असो वा विमान, श्रद्धा असावी लागते. पण आपली श्रद्धा काल्पनिक आणि त्यांची Tradition हा जो भेदभाव आहे, त्यावर मात्र आता विजिगीषु वृत्तीने उत्तर देण्याची वेळ आली आहे..
वेळ आली आहे ना ? की अजून वेळ आहे?
अ.र.वालावलकर

Leave a comment