माधव गाडगीळ: सह्याद्रीचा वेडा ऋषी.. कैवल्यप्राप्ती – अ.र.वालावलकर 🖌

सह्याद्रीच्या कणाकणाशी ज्यांचं नातं जडलं, त्या ऋषीतुल्य माणसाच्या शब्दांची किंमत आम्हाला त्यांच्या हयातीत कळू नये, हीच आमच्या सुसंस्कृतपणाची सर्वात मोठी शोकांतिका आहे, डोंगराएवढा माणूस समोर असताना आम्ही डंपरच्या ढिगाऱ्यात आमचं भविष्य शोधत राहिलो, हेच आमचं दुर्दैव आणि आज शेवटी ते डोंगर कोसळलं, ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ् माधवराव गाडगीळ काळाच्या आड हरपले..

ज्या अहवालाची आपण धूळ खात रवानगी केली, त्यासोबत आपण गाडगीळ नावाच्या विचारालाही जिवंतपणीच मारून टाकलं होतं, इतकी आपली कोकणातल्या लोकांची मनस्थिती आणि परिस्थिती विदारक आहे.

गाडगीळ नावाचा हा माणूस म्हणजे गळ्यात कॅमेरा आणि हातात डायरी घेऊन सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून हिंडणारा एखादा आधुनिक भगीरथच. त्यांनी “गाडगीळ समिती” अहवाल लिहिताना केवळ आकडेमोड केली नाही, तर सह्याद्रीच्या प्रत्येक पानापानाचा आणि समुद्राच्या प्रत्येक लाटेचा श्वास मोजला. त्यांना स्वप्न पडलं होतं हिरवागार कोकण आणि सुरक्षित सह्याद्रीचं. पण आपल्याला स्वप्नं पडतात ती फक्त रॉयल्टीची आणि परमिटची..

आमचे लाडके भाई आणि पांढरपेशी विध्वंसक

आमच्या कोकणात आता निसर्ग उरलाय फक्त पर्यटकांच्या सेल्फीपुरता. बाकी जमिनीचा ताबा तर खाण बादशहा आणि गल्लीतल्या पुढारी मंडळींनी घेतलाय.

पूर्वी कोकणात नारळ सुपारीचे वाडे असायचे, आता तिथे JCB आणि DUMPER चे ताफे असतात. आमचे आमदार साहेब आणि खासदार महोदय विधानसभेत लोकसभेत पर्यावरणावर भाष्य करतात आणि संध्याकाळी त्याच साहेबांचे खास कार्यकर्ते ज्यांना आपण शेठ अथवा दादा किंव्हा भाई म्हणतो ते गुपचूप डोंगर पोखरण्याचे कॉन्ट्रॅक्ट्स मिळवतात. ही यांची निसर्ग सेवा अजबच आहे, म्हणा.

गाडगीळ नावाच्या माणसाने सांगितलं की बाबांनो, हे डोंगर फोडू नका, उद्या तुमचीच घरं वाहून जातील. पण आमचे स्थानिक पुढारी ओरडले “अहो, हा माणूस विकासाच्या आड येतोय” खरं तर गाडगीळ विकासाच्या आड येत नव्हते, ते यांच्या Bank Balance च्या आड येत होते. मग काय, तो अहवाल कपाटात असा काही कोंडला की आता फक्त दरडी कोसळल्यावरच त्याची आठवण येते.

आमच्या कोकणी माणसाचं एक विशेष कौतुक करावसं वाटतं. आम्हाला अमूल्य गोष्टींची किंमत कधीच कळली नाही, बहुदा कळण्याची कुवतच नव्हती.

एखाद्याने सोशल मीडियावर “कोकणची माणसं साधी भोळी…” किंव्हा “येवा कोकण आपलाच आसा” या गाण्यावर किंव्हा वाक्यावर दोन चार वेड्यावाकड्या स्टेप्स केल्या किंवा निव्वळ पांचट विनोद करून रील बनवली की आम्ही त्याला कोकणचा सुपरस्टार बनवून आम्ही डोक्यावर घेतो. त्याच्या मागे हजारो लाईक्सचा पाऊस पाडतो. पण ज्या माणसाने आपलं संपूर्ण आयुष्य आमच्या जमिनीची सुपीकता आणि पाण्याचे स्रोत जपण्यासाठी घालवलं, ते माधव गाडगीळ आम्हाला मात्र रिकामटेकडा माणूस वाटतो…

आम्हाला अभ्यासू माणसापेक्षा आरडाओरडा करणारा माणूस जास्त भावतो. गाडगीळ साहेबांनी सह्याद्रीपासून समुद्रकिनाऱ्यापर्यंतचा भाग वाचवण्यासाठी जी तपश्चर्या केली, त्याचं मोल करायची आमची कुवत नाही (मुद्दाम लायकी बोललो नाही अथवा काही लोकांच्या भावना दुखावतील) 

आपण एवढे संकुचित झालो आहोत की आपल्याला उद्याच्या पिढीच्या रक्ताळलेल्या भविष्यापेक्षा आजच्या डंपरची घरघर जास्त मधुर वाटू लागली आहे.

किती जणांनी गाडगीळ अहवाल वाचला आहे माहित नाही पण अहवाल वाचनावेळेस निदर्शनात आलेल्या काही गोष्टी बहुदा ज्यामुळे त्यांच्या अहवालला विरोध केला गेला  

— ग्रामसभेची सत्ता : तुमच्या गावात खाण येणार की कारखाना, याचा निर्णय वातानुकुलीत केबिनमध्ये बसलेला मंत्री नाही, तर गावाची ग्रामसभा घेईल. हा अहवाल सामान्य माणसाला मालक बनवणारा होता.

— डोंगर वाचवा : दरडी टाळा सह्याद्रीचे डोंगर पोखरले तर पाणी जमिनीत न मुरता मातीसह खाली येईल. आज ज्या दरडी कोसळत आहेत, त्याचा इशारा गाडगीळ साहेबांनी २०११ मध्ये दिला होता.

— शेती आणि बागायतीला प्राधान्य : प्रदूषणकारी उद्योगांऐवजी सेंद्रिय शेती, हापूस आणि पर्यटन वाढवा, जेणेकरून निसर्ग न संपता कायमस्वरूपी रोजगार मिळेल.

— बंदी नाही, फक्त शिस्त : लोकांनी घरं बांधण्यावर किंवा शेतीवर कोणतीही बंदी नव्हती. फक्त निसर्गाचा समतोल बिघडवणारे मोठे खाण प्रकल्प आणि धरणे यांना संवेदनशील भागात विरोध होता.

— स्थानिक जलस्रोतांचे रक्षण : नद्या आणि झरे हे कोकणाचे रक्त आहे. ते खाणींच्या राखेने किंवा केमिकलने प्रदूषित होऊ देऊ नका, अन्यथा भविष्यात पिण्याचं पाणीही विकत घ्यावं लागेल

थोडक्यात सांगायचं तर गाडगीळ साहेबांनी सांगितलं होतं, निसर्ग ही तुमची मुदत ठेव आहे, तिचं फक्त व्याज खा, मुद्दल विकू नका.. गाडगीळ साहेबांचा अहवाल म्हणजे काही कागद नव्हते, ते कोकणाचं कुंडली होतं. पण आम्ही कुंडली बघण्यापेक्षा लक्ष्मीदर्शन घेण्याला महत्त्व दिलं.

आज पु ल असते तर निश्चितच म्हणाले असते…कोकणी माणूस हट्टी असतो, पण तो हट्ट निसर्ग जपण्यासाठी असता तर आज आमचा सह्याद्री रडला नसता.

खरं तर, निसर्गाच्या या वेड्या भक्ताला शब्दांच्या चौकटीत बसवणं कठीणच! त्याने कधी विकासाच्या गराड्यात स्वतःचं माणूसपण गहाण ठेवलं नाही की मातीचा सौदा केला नाही. आज तो आपल्यात नसला, तरी घाटावरचा एखादा अनाम वारा किंवा कोकणातल्या देवराईतली ती निबीड शांतता त्याच्या अस्तित्वाची साक्ष देत राहील. मातीच्या या अस्सल लेकाची ही एक्झिट म्हणजे निसर्गाच्या ग्रंथातलं एक सुवर्णपान मिटण्यासारखं आहे

अशा या सह्याद्रीपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली.

क्षमस्व गाडगीळ जी तुम्हाला समजण्याइतकी आमची कुवत नाही.

अ.र.वालावलकर 

Leave a comment