मध्यमवर्गीय घरात काजूचा डब्बा ही वस्तू कपाटातील लॉकरपेक्षाही जास्त सुरक्षित ठिकाणी ठेवलेली असते. हा डब्बा म्हणजे केवळ सुकामेवा नसून, तो घरातील प्रतिष्ठेचा आणि संयमाचा अंतिम कस असतो.
डब्बा उघडण्याची पूर्वतयारी
काजूचा डब्बा उघडणे ही काही चहासाठी साखर काढण्याइतकी सोपी गोष्ट नाही. यासाठी घरात आधी शांतता लागते. डब्याचे टोपण उघडताना होणारा तो टक्क असा आवाज शेजारच्यांना किंवा घरातल्या मुलांना ऐकू गेला, की समजा तुमच्या आनंदावर विरजण पडलं..
घरात काजू लपवून ठेवलेल्यांना कपाटाच्या कोपऱ्यातून डब्बा बाहेर काढताना तो आवाज करणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
त्या घट्ट बसलेल्या टोपणाला पीळ देताना माणसाच्या चेहऱ्यावर जे भाव असतात, ते एखाद्या अवघड गणिताचं प्रमेय सोडवणाऱ्या विद्यार्थ्यासारखे असतात.
डब्बा उघडल्या उघडल्या जो एक खमंग, खवटपणाच्या किंचित अलीकडे असलेला काजू गंध नाकात शिरतो… आहा !!!, त्या क्षणी आपण कुबेरापेक्षा श्रीमंत आहोत असे वाटते.
तो निर्णायक क्षण प्रत्येक काजू खवाय्यांच्या आयुष्यात येतो जेव्हा डब्यात हात घातल्यावर सख्खा काजू हाताला लागतोय की तुकडा , यावर तुमच्या त्या दिवसाचं नशीब अवलंबून असतं. तो अखंड काजू बाहेर काढणं म्हणजे एखाद्या उत्खननात मौल्यवान मूर्ती सापडल्यासारखा आनंद असतो. मग तो काजू तोंडात टाकून, त्याच्या चवीचा विचार करत असतानाच अचानक कोणीतरी येतंय असा भास होतो आणि घाईघाईने डब्बा बंद करून पुन्हा कपाटात ढकलला जातो.
“काजू खाण्यात जो आनंद आहे, त्यापेक्षाही जास्त आनंद तो डब्बा घरातल्या इतर कोणालाही न कळू देता उघडण्यात आणि पुन्हा मूळ जागी ठेवण्यात असतो!”
काजूचा डब्बा उघडणं हे केवळ खाण्याचं काम नसून ते एक ‘मॅनेजमेंट स्किल’ आहे, असं म्हणायला हरकत नाही.

Leave a comment