सामान्य माणसाचा असामान्य मेवा..  🖌अ.र.वालावलकर 

हे बघा, आर. के. लक्ष्मणांचा तो कॉमन मॅन म्हणजे बिचारा जन्मापासूनच कॉम्प्रमाईजच्या खांद्यावर बसून प्रवास करणारा माणूस. जो जन्मभर फक्त रांगेत उभा राहिला, पण ज्याच्या वाट्याला कधीच पहिली नंबरची खुर्ची आली नाही. तोच आमचा हा कोट-धोतरधारी माणूस , तो जेव्हा कोकणात येतो आणि समोर काजूची पाकिटं बघतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे भाव उमटतात.. ते फक्त त्यालाच त्याच्या नजरेच्या आरशात दिसतात

आमचा हा कॉमन मॅन नेहमीप्रमाणे “ग” गोंधळलेल्या अवस्थेत दुकानात उभा राहतो. समोर “सिंधुदुर्ग”चा बोर्ड आणि हातात काजूचं पाकीट, खरं तर, मध्यमवर्गीय माणसाला काजू म्हणजे ड्राय फ्रूट वाटतच नाही, त्याला ते बजेट कोलमडवणारं फळ वाटतं.

कोकणातल्या काजूच्या दुकानात शिरल्यावर या माणसाची अवस्था एखाद्या मध्यमवर्गीय बापाने मुलीच्या लग्नात दागिन्यांच्या दुकानात गेल्यासारखी होते. तो पाकिटाकडे असा बघतोय, जणू काही त्यात काजू नसून इन्कम टॅक्स रिफंडचे चेक भरलेले आहेत.

“कोकणचा माणूस पाहुण्याला काजू देतो, तेव्हा तो फक्त काजू देत नाही, तर तो आपल्या काळजाचा तुकडा डिशमध्ये काढून देतो. आणि घेणारा जर काजूरसिक ऐवजी गिऱ्हाईक असेल, तर तो काजू जरा जास्तच खारट आहेत की काय? असं म्हणून त्या भावनेचा चक्काचूर करतो“

पण आपला हा कॉमन मॅन तसा नाही. तो पाकिटावरचा मजकूर असा वाचतोय जणू काही ती रेल्वेची वेटिंग लिस्ट आहे. त्याला वाटतंय, आयुष्यभर ऑफिसमध्ये साहेबांच्या शिव्यांचे गर खाल्ले, आज निदान हे कोकणी गर तरी खाऊन बघूया

तसंही, काजू आणि कॉमन मॅनमध्ये एक मोठं साम्य आहे. काजूवर जसं कडक कवच असतं, तसंच या कॉमन मॅनवर बजेटचं कडक कवच असतं. पण एकदा का ते कवच फुटलं, की आतून जो पांढराशुभ्र गर निघतो, त्यालाच आपण “माणुसकी“ म्हणतो.

त्या चष्म्यातून दिसणारे त्याचे डोळे बघा त्यात एकच प्रश्न आहे, हे पाकीट घेतल्यावर महिनाअखेरपर्यंत घर चालेल ना? आणि तरीही, तो काजूचा तो गोडवा आठवून तो गालातल्या गालात हसतोय. कारण त्याला माहीत आहे, राजकारणी येतील आणि जातील, सरकारं पडतील आणि उठतील, पण सिंधुदुर्गचा काजू आणि त्याची ही 

‘ब“ बावळट वृत्ती कधीच बदलणार नाही.

काजू खाण्यातली मजा ही तो खाण्यात नाही, तर तो आपणच न विकलेल्या जमिनीतल्या झाडावरील काजू फुकट खातोय की आफ्रिकेतून आलेला काजूला #कोकण नाव लावून विकत घेतलेल्या काजुवर.. हे  अवलंबून असते.

खिशात कॉमन मॅनचं बजेट आणि हातात सामंत वालावलकर आणि कंपनीचे गावठी काजू असले की, माणसाला रेशनिंगच्या रांगेत उभं राहतानाही आपण कुबेराचे अवतार आहोत असा भास होतो..

खरोखरच, काजू हे केवळ फळ नसून ते कोकणचं आणि सामान्य माणसाच्या आनंदाचं एक Currency आहे.

Leave a comment