दशावतारी कलाकार हे नुसते नट नसतात, ते कोकणी संस्कृतीचे जिवंत वारसदार असतात. ते रंगमंचावर देवत्व साकारतात, पण पडद्यामागे त्यांची कहाणी खूप वेगळी आणि अनेकदा वेदनादायी असते.
कलेची तपश्चर्या आणि पोटाची आग त्यांना धड झोपू देत नाही आणि जगण्याची धावपळ त्यांना अमरत्व देतं.
दशावतार हा व्यवसाय त्यांच्यासाठी केवळ नाटक नाही; तो त्यांचा धर्म आणि उपजीविकेचा आधार आहे…
ही कला त्यांना वारसा हक्काने मिळते,लहानपणापासूनच ते तालीम करतात. वयाच्या सोळाव्या सतराव्या वर्षी ते “स्त्री-सज्जन“ करायला लागतात, आणि नंतरच्या काळात प्रमुख भूमिकांकडे वळतात.
त्यांची रात्र कलेच्या सेवेत जाते, पण दिवसा त्यांना शेतीत राबून किंवा मिळेल ते काम करून पोट भरावे लागते. नाटकांच्या दिवसांतही, पहाटे खेळ संपल्यावर घरी जाऊन थोडी विश्रांती घेऊन पुन्हा दैनंदिन कामाला जुंपून घ्यावे लागते.
रात्रभर जागणं, जड वेशभूषा, आणि थंडी-वाऱ्यात एका गावातून दुसऱ्या गावात प्रवास करणं यामुळे त्यांचे आरोग्य सतत दुर्लक्षित राहते. अनेक कलाकार उतारवयात सांधेदुखी आणि आवाजाच्या समस्यांनी त्रस्त होतात.
त्यांना समाजात आदर मिळतो, पण त्याचवेळी आर्थिक स्थैर्य मिळत नाही. लोकांना आनंद देणारा हा कलाकार स्वतःच्या कुटुंबासाठी अनेक मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही. कलेची सेवा करतानाही त्यांना “तुटपुंज्या मानधनावर“ समाधान मानावे लागते, ज्यामुळे त्यांच्या मनात एक खोल वेदना असते.
“आम्ही देवाची सोंगं करतो, पण आमचं आयुष्य ”रंगलेलं” नसतं. रंग उतरला की माणूस परत जमिनीवर येतो.” – एका कलाकाराची भावना.
अ.र.वालावलकर 🖌

Leave a comment